https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/mumbaiunn_201912336171.jpg
मुंबई विद्यापीठ चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन; नागपूर विद्यापीठाचा केला पराभव

मुंबई विद्यापीठ चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन; नागपूर विद्यापीठाचा केला पराभव

मुंबई, भारती, एसएनडीटी आणि नागपूर विद्यापीठ संघ राष्ट्रीय पातळीवर खेळणार

by

ठळक मुद्दे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर ५ ते ९ डिसेंबर दरम्यान झालेल्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाने अव्वल क्रमांकासह ‘चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन’चा बहुमान पटकावला. द्वितीय स्थानी भारती विद्यापीठ पुणे, तृतीय स्थानी एसएनडीटी (मुंबई), तर चौथे स्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पटकाविले. याप्रसंगी सर्व चमू आणि प्रशिक्षकांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.  

समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य वसंत घुईखेडकर, प्रदीप खेडकर, प्रफुल्ल गवई, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सदस्य सुनील डंबारे, पंच समितीचे अध्यक्ष सतीश डफळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक अविनाश असनारे उपस्थित होते. पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत अव्वल चार संघ मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे अखिल भारतीय स्तरावर पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते दमदार कामगिरी करतील आणि विभागाचा नावलौकिक वाढवतील, असा आशावाद पाहुण्यांनी व्यक्त केला तसेच सर्व चमूंतील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संचालकांचे कौतुक केले. संचालन  विजय पांडे व आभार प्रदर्शन अविनाश असनारे यांनी केले.

वाराणसी येथे होणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
अखिल भारतीय महिला कबड्डी स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी) येथे होत आहे. दरम्यान, पाच दिवस चाललेल्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ६१ संघ, ७२० खेळाडू व १२० संघ प्रशिक्षकांनी उपस्थिती दर्शविली. चार मैदानांची निर्मिती व विविध समित्यांचे गठण केले. संलग्नित महाविद्यालयांतील १५० शारीरिक शिक्षण संचालकांचा सहभाग, अमूल्य योगदान, सहकार्य, विदर्भ कबड्डी फेडरेशन समितीच्या पंचांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले, असे अविनाश असनारे म्हणाले. 

असे रंगले सामने      
सोमवारी चुरशीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाने नागपूर विद्यापीठाचा ३० विरुद्ध १९ असा ११ गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. मुंबई विद्यापीठातर्फे मेघा, समरीन, साक्षी आणि नसरीन यांनी उत्कृष्ट चढाई केली. दुसºया अटीतटीच्या सामन्यात भारती विद्यापीठ संघाने एसएनडीटी संघाचा २२ विरुद्ध १९ असा अवघ्या तीन गुणांनी निसटता पराभव करीत स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. संघातर्फे काजल जाधव, आदिती जाधव आणि पूनम तांबे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.