Citizenship Amendment Bill (CAB): या ‘कॅब’चा ड्रायव्हर विभाजनकारी; काँग्रेसचा हल्लाबोल
"या कॅब ड्रायव्हरचे लक्ष्य राजकीय लाभ उठवण्याबरोबरच आपल्या सामाजिक आणि संविधानिक मुल्यांना अस्थिर आणि नष्ट करणे हे आहे."
by लोकसत्ता ऑनलाइनसंसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नागरिकत्व संशोधन विधेयक चर्चेसाठी मांडले. त्यानंतर लोकसभेत यावर सध्या अपेक्षेप्रमाणे घमासान चर्चा सुरु आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, “हे विधेयक आणणारी व्यक्ती देशाचे विभाजन करणारी व्यक्ती आहे,” अशा शब्दांत काँग्रेस वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या विधेयकाला विरोध करताना शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे विधान केले आहे.
नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन (कॅब) सरकारवर हल्ला करताना सिब्बल म्हणाले, हे विधेयक एक अशी कॅब आहे ज्याचा चालक विभाजनकारी आहे. हे विधेयक पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथील गैरमुस्लिम अल्पसंख्यांकांना अत्याचारापासून वाचवण्यासाठी त्यांना भारताचे नागरकत्व प्रदान करण्यासाठी आणण्यात आले आहे.
काँग्रेसने म्हटले होते की, संसदेत आम्ही या विधेयकाला कडाडून विरोध करणार आहोत. कारण हे देशाचे संविधान आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांविरोधात आहे. सिब्बल यांनी ट्विट करुन म्हटले, “कॅब विधेयक एक असे विधेयक आहे ज्याचा चालक विभाजनकारी आहे. ज्याचे लक्ष्य राजकीय लाभ उठवण्याबरोबरच आपल्या सामाजिक आणि संविधानिक मुल्यांना अस्थिर आणि नष्ट करणे हे आहे. त्यामुळे या विरोधात सर्वांत हात मिळवा, एकत्र या आणि देशाला वाचवा.”