https://images.loksatta.com/2019/12/14-16.jpg?w=830

अरे हे काय झालं?; पबजी खेळून ‘ते’ झाले कोट्यधीश

पबजी (PUBG) हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे.

by

ऑनलाइन गेम्सच्या दुनियेतील ‘पबजी’ म्हणजेच ‘प्लेयर अननोन्स बॅटलग्राऊंड्स’ या गेमने जगभरातील युवकांना आकर्षित केले आहे. हा गेम आता केवळ मजा मस्ती करण्यासाठी खेळला जात नाही. तर पैसे कमावण्यासाठी सुद्धा खेळला जात आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी नुकतीच एक ‘आंतरराष्ट्रीय पबजी स्पर्धा’ खेळली गेली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाने तब्बल १ कोटी २९ लाख रुपये जिंकले.

या विजयी संघाचे नाव ‘टीम बिगेट्रोन आरए’ असे आहे. या संघात एकूण चार खेळाडू होते. त्यांनी चीनच्या ‘टीम टॉप इस्पोर्ट्स’ या संघाला हरवत विजेते पदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ‘टीम टॉप इस्पोर्ट्स’ला ९०,००० डॉलर मिळाले आहेत. तर थायलंडची टीम मेगा इस्पोर्ट्स तिसऱ्या स्थानावर राहिली. त्यांना ४५ हजार डॉलर देण्यात आले.

२९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ५२ देशांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ‘पबजी मोबाइल क्लब ओपन’ असे या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले होते. गेले तीन महिने या स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या सुरु होत्या. अखेर विविध देशांतील एकूण ५२ संघांची मुख्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये ‘टीम बिगेट्रोन आरए’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

काय आहे या गेममध्ये?

पबजी (PUBG) हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे समजते. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकटय़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते. फेसबुक लॉगइनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात ते या गेमच्या प्लॅटफॉर्मवर. या गेमचे वैशिष्टय़ म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाइव्ह चॅटिंगही करता येतं. म्हणजे आधी एका सायबर कॅ फेमध्ये जमून आरडाओरड करत काऊ ण्टर स्ट्राइक खेळला जायचा तसंच फक्त आता या गेममुळे कुठूनही एकाच वेळेस ऑनलाइन बसून प्लॅनिंग करून हाणामारी करत हा गेम जिंकता येतो इतकाच काय तो वेगळेपणा; पण याच लाइव्ह चॅटिंगमुळे हा गेम इतका लोकप्रिय झाला आहे. आता यात हिंसा असल्याने हा गेम केवळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. मात्र आता स्मार्टफोन वापरणारी सर्वच वयोगटांतील मुले हा गेम स्वत:च्या किंवा आईबाबांच्या मोबाइलवरून खेळताना दिसतात. या गेममुळे मुलांमधील हिंसक वृत्ती वाढण्याची शक्यता असून त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, असं मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.