https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/jaganmohan-reddy87_201906248364.jpg
Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटरची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा; म्हणाले, मलासुद्धा दोन मुली

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटरची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा; म्हणाले, मलासुद्धा दोन मुली

Hyderabad Encounter : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबादच्या एन्काऊंटची प्रशंसा केली आहे.

by

तेलंगणाः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबादच्या एन्काऊंटची प्रशंसा केली आहे. तसेच तेलंगणा पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. डॉक्टर दिशाच्या सर्व आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. एकीकडे काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला आहे, तर काहींनी पोलिसांच्या कृतींचं समर्थन केलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगनमोहन रेड्डी यांनी मी दोन मुलींचे वडील असल्याचंही सांगितलं आहे. मला एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. जर माझ्या मुलींसोबत असं काही झालं असतं तर माझी काय प्रतिक्रिया असती?, मी कोणता न्याय मागितला असता?, असंही रेड्डी म्हणाले आहेत.

तात्काळ न्याय मिळण्यासाठी कायद्यातील बदल गरजेचा आहे, असंही रेड्डींनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे ऍड. उज्ज्वल निकम, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसींनी या कारवाईला विरोध केलेला आहे. दरम्यान, हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.