https://images.loksatta.com/2019/12/saina-n.jpg?w=830

“…तर त्या पीडितेनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या”

पोलिसांचे कौतुक केलेल्या ट्विटवर टीका करणाऱ्याला सायनाने सुनावले

by

हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

बहुचर्चित प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर बहुतांश लोकांनी या कृत्याचे समर्थन केले, तर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला. “तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम”, असे ट्विट करत तिने पोलिसांचे समर्थन केले. मात्र तिच्या या ट्विटवर एका पत्रकाराने टीका केली. “तू पोलिसांचा उदो उदो करून टाळ्या मिळवशील, पण तुझ्यासारख्या रोल मॉडेलने असे वक्तव्य करणे बरोबर नाही”, अशी टीका तिच्यावर करण्यात आली.

त्याच्यावर सायनाने टीकाकाराला चांगलेच सुनावले. “त्या पिडीतेला किती भीती आणि वेदना झाल्या असतील याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा बलात्काऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तेव्हा परिस्थिती काहीही असो, मला आनंद झाला. मला कोणाकडून कौतुकाची अपेक्षा नाही. तसेच तुमच्या मतांमुळे बलात्कार करणाऱ्यांच्या विचारप्रणालीत काहीही बदल होणार नाही. जर त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या”, असे तिने सडेतोड उत्तर दिले.

काय घडलं?

प्रकरणातील चारही आरोपींना अधिक तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी नेलं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पळून जाऊ नये असा इशारादेखील देण्यात आला, पण ते न थांबल्यानं पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३ ते ६ दरम्यान ही घटना घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.