खूशखबर! आता धोनी दिसणार नव्या रुपात; देशाची शौर्यगाथा उलगडणार
या नवीन रुपात धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
by ऑनलाइन लोकमतमहेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या सुरु आहे. धोनी यापुढे क्रिकेटच्या मैदानात दिसणार की नाही, यावर मतमतांतरे आहेत. कारण इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी एकदाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदाात उतरलेला नाही. धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसला नसला तरी आता तो एका नव्या रुपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या नवीन रुपात धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
विश्वचषकानंतर आर्मीबरोबर सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. यावेळी त्याने आर्मीतील जवानांचे काम जवळून पाहिले आहे आणि या गोष्टीचाच फायदा धोनीला यापुढे होणार आहे. धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांनी शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.
देशाचे सैनिक हे महत्वाचे असतात. पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यांनी केलेले शौर्य सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सैनिकांनी कशी मर्दुमकी गाजवली आहे, हे दाखवण्याचा या मालिकेचा उद्देश असेल. या मालिकेसाठी धोनीची निवड केल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेची संहिता लिहिण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.