https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2019-12-09-at-4.09.52-pm_201912336095.jpeg
कैदीच बनवतायेत ‘फांसी का फंदा’; निर्भयाच्या दोषींसाठी फास बनविण्याची तयारी सुरु

कैदीच बनवतायेत ‘फांसी का फंदा’; निर्भयाच्या दोषींसाठी फास बनविण्याची तयारी सुरु

२०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता

by

ठळक मुद्दे

पाटणा - बिहार येथील बक्सर मध्यवर्ती कारागृहात फाशीसाठी लागणाऱ्या फास बनविण्याची तयारी सुरु आहे. बक्सर कारागृहातील कैदी हा फास तयार करीत आहेत. २०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता आणि नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी निर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे. अशी माहिती नवभारत टाईम्सच्या न्यूजपोर्टलवर देण्यात आली आहे.

गंगेच्या काठावर वसलेले बक्सर कारागृहाला फाशीचा फास बनविण्यासाठी खास ओळखले जाते. असा समज आहे की या कारागृहात अतिशय मजबूत फास तयार केला जातो. या तुरुंगात फार पूर्वीपासून फास बनविला जात आहे. बक्सर कारागृहाचे अधीक्षक विजय कुमार अरोरा म्हणतात की, 'माझ्या वरिष्ठांनी मला फाशीसाठी १० फास  तयार ठेवण्यास सांगितले. हे फास कोणत्या तरुंगामधून मागितले गेले आहेत हे मला माहित नाही. मात्र, आम्ही त्यासाठी काम सुरू केले आहे.'

तीन दिवसांपूर्वी आले निर्देश
तीन दिवसांपूर्वी, बक्सर कारागृह अधीक्षकांना फास तयार करण्यासाठी निर्देश पाठविण्यात आले. नाव जाहीर न करता तुरूंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नुकतीच गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निर्भया दोषींची क्षमा माफी याचिका नाकारण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे याचवेळी हे निर्देश देणं म्हणजे निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येऊ शकते असे चिन्ह दिसत आहेत'

तीन ते चार दिवस लागतात 'फांसी का फंदा' बनवायला
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'अफझल गुरूचा फाशीचा फास बनविणारे काही कैदी अजूनही बक्सर कारागृहात आहेत. या कैद्यांना फास कसा बनवायचा हे चांगल्याप्रकारे माहित आहे. सात कैद्यांना तीन ते चार दिवस फास बनविण्यास वेळ लागतो.

इतकी असते फाशीच्या दोरखंडाची लांबी
अफझल गुरूला फाशी देण्यासाठी वापरलेल्या फासाची किंमत १७२५ रुपये होती. तथापि, आता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, तर आता त्याची किंमतही वाढणार आहे. फाशी देणार्‍या दोरखंड म्हणजेच फासाच्या लांबीबद्दल बोललं तर हे दोषी व्यक्तीच्या लांबीपेक्षा १.६ पट जास्त असतो.

'... जेणेकरून वेळेवर फास तयार होईल'
कारागृहाचे आयजी मिथिलेश मिश्रा सांगतात की, 'कोणत्याही दोषीला शिक्षा सुनावण्याच्या प्रक्रियेस उशीर होऊ नये. म्हणून फास आम्ही आधीच तयार करून ठेवतो. तसेच संबंधित कारागृहांना गरज पडल्यास ते आम्ही पुरवू शकतो.