दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला ‘मिस युनिव्हर्स २०१९’ चा किताब
जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
by लोकसत्ता ऑनलाइनअटलांटा येथे पार पडलेल्या ६८ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले. जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धकांना टक्कर देत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.
“मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.” पुरस्कार स्विकारल्यानंतर तिनं अशा शब्दात सर्वांचे आभार मानले.
अमेरिकेत सोमवारी सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात जोजिबिनीला ‘मिस युनिव्हर्स’चा मानाचा मुकूट देण्यात आला. टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी २६ वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधात तिने आवाज उठवला होता. त्यामुळे ती सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती. अंतिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं.