https://images.loksatta.com/2019/12/AM-1.jpg?w=830
आनंद महिंद्रानी घेतली दखल

आनंद महिंद्रांनी घेतली ‘या’ मराठमोळ्या महिलेची दखल; तिची संघर्षकथा तुम्हालाही देईल प्रेरणा

मला कोणी या महिलेचा संपर्क क्रमांक देऊ शकेल का?; अशी विचारणा महिंद्रा यांनी केली आहे

by

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच त्यांच्या ट्विटसमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते ट्विटवरुन सुविचार, विनोदी पोस्ट, सामाजिक संदेश ट्विट करत असतात. काहीवेळा ते ट्विटवरुन थेट वेगवेगळ्या लोकांना मदत करत असतात. असेच एक ट्विट त्यांनवी नुकतेच केले होते. त्यांनी महिंद्रा बोलेरो गाडी चालवणाऱ्या एका महिलेचा मी शोध घेत असल्याचे ट्विटवरुन म्हटलं होतं. त्यांना एकाने व्हॉट्सअपवर एका व्यक्तीने या महिलेचा फोटो पाठवला होता. त्यांनी या महिलेबद्दल मला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे असं म्हटलं होतं. अखेर आनंद महिंद्रा शोध घेत असलेल्या माहिलेची ओळख पटली असून तिची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रांनी सहा डिसेंबर रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एक साडी नेसलेली महिला बोलेरो गाडी चालवताना दिसत होती. “या महिलेचे नाव नकुसा मासाळ असे आहे. त्या नववी इयत्तेपर्यंतच शिकल्या आहेत. मात्र वाहन परवाना मिळवण्यासाठी त्यांनी त्यांनी खूप मेहनत घेतली. बोलेरो गाडीमधून मालवाहतूक करण्यासाठी त्यांनी परवाना मिळवला आहे. मला ज्या व्यक्तीने हे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत त्या व्यक्तीला या महिलेबद्दल इतकीच माहिती आहे. मला कोणी या महिलेचा संपर्क क्रमांक देऊ शकेल का? मला या महिलेची संपूर्ण संघर्षकथा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल,” असं महिंद्रा यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.

कोण आहे नकुसा?

आनंद महिंद्रा शोध घेत असणाऱ्या आणि फोटोत दिसणाऱ्या नकुसा मासाळ या सांगली जिल्ह्यामधील कवठेमहंकाळ येथील रहिवाशी असल्याची स्पष्ट झालं आहे. “अनेकदा नको असणाऱ्या मुलींना नकोशी म्हटलं जातं. त्यातूनच आपल्याला नकुसा हे नाव मिळालं आहे,” असं नकुसा मासाळ सांगतात. कोल्हापूरमधून कोकणमध्ये भाजीपाला पुरवण्याचं काम नकुसा करतात. मागील अनेक वर्षांपासून त्या बोलेरो गाडीमधून मालवाहतूक करत आहेत. नागमोडी घटरस्त्यावरुन माल वाहून नेण्याच्या काम करण्यासाठी लागणारे कौशल्य नकुसा यांच्याकडे आहे. म्हणूनच त्या वर्षाच्या बारा महिने हे काम करतात. उन्हाळा असो, पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस असो किंवा हिवाळ्यामध्ये घाटातील दाट धुकं असो नकुसा यांनी कधीच या कारणामुळे आपल्या कामात खंड पडू दिला नाही. कोल्हापूरहून त्या घाटरस्ता उतरुन कोकणात जातात.

वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांना तीन मुले झाले. मात्र पतीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर संसाराची आणि तिन्ही पोरांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. मात्र या जबाबदारीच्या ओझ्याखाली कोलमडून न जाता त्या धीराने उभ्या राहिल्या. त्यांचे पतीही भाजीपाला कोकणात पुरवण्याचे काम करायचे. त्यांनी या कामासाठी एक चालक ठेवला होता. मात्र घाटातील धुकं आणि नागमोडी वळणे यांना पाहून त्याने काही दिवसांमध्येच काम सोडलं. असं अनेकदा झाल्यानंतर अखेर नकुसा यांनीच गाडीचे स्टेअरिंग हाती घेण्याचं ठरवलं. त्यांनी गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि मालवाहू गाडी चालवण्याचा परवाना मिळवला. आता त्याच आपल्या बोलेरोमधून मालाची ने-आण करतात. त्यांनी कष्टाने आपल्या गावी एक छान घरही बांधले आहे.