https://images.loksatta.com/2019/12/Friends.jpg?w=830
'फ्रेण्ड्स'

‘फ्रेण्ड्स’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

'फ्रेण्डस'च्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

by

‘फ्रेण्ड्स’ या जगप्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम केलेल्या रॉन लिबमन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. ‘फ्रेण्ड्स’मध्ये रॉन यांनी रेचल ग्रीनच्या वडीलांचे पात्र साकारले होते. १९५० पासून ते अभिनय श्रेत्रात कार्यरत होते. त्यांचे सर्व काम पाहणाऱ्या अबराम्स आर्टीस्स एजन्सीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“रॉन यांचे निधन झाल्याचे तुम्हा सर्वांना कळवताना दुख: होत आहे. रॉन हे एक उत्तम अभिनेते होते. त्यांनी वेगवेगळे चित्रपट, मालिका आणि रंगमंचावरुन आपले अभिनय कौशल्य दाखवले. आम्ही त्यांची पत्नी जेसीका आणि कुटुंबियांच्या मागे ठापपणे उभे आहोत,” असं अबराम्स आर्टीस्स एजन्सीने ‘द व्रॅप’ला दिलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

‘फ्रेण्ड्स’मध्ये रॉन यांनी जेनिफर एनीस्टोनने साकारलेल्या रेचल या पात्राचे वडील म्हणजेच डॉक्टर लिओनार्ड ग्रीन हे पात्र साकारले होते. पटकन संतापणारे हे पात्र अनेकांच्या मनात घर करुन गेले होते. रॉन यांनी १९९३ साली टॉनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलनेही त्यांच्या निधनासंदर्भात ट्विट केले आहे. “रॉन लिबमन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. रंगमंच, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याने सर्वोत्तम अभिनेत्याचा टॉनी पुरस्कार जिंकला होता. एंजल्स इन अमेरिका या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” असं ट्विट या पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

‘मी इतक्या वर्ष रंगभूमी, चित्रपटांमध्ये काम केलं पण लोक मला रेचलचे वडील म्हणूनच ओळखायचे,’ असंही रॉन यांनी सांगितलं होतं. “मला प्रेमळ आणि गोड गोड भूमिका आवडत नाही म्हणून मला डॉक्टर लिओनार्ड यांची भूमिका फार आवडली होती. ती भूमिका रॉसच्या भूमिकेच्या विरोधात होता. माझे बरेचसे काम हे रेचल आणि रॉस या दोघांबरोबरच होते. मला ते दोघेही आवडयाचे म्हणूनच मला ही भूमिका साकारताना मजा आली होती,” असंही रॉन एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते. रॉन यांच्या निधनाच्या वृत्तानंतर ‘फ्रेण्डस’च्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रॉन यांनी एव्ही क्लबला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला टीव्ही पहायला आवडत नाही असं सांगिलं होतं. “मला जेव्हा अनेकजण ही (फ्रेण्ड्स) मालिका पाहण्याचा सल्ला द्यायचे. तरी मी कधीच ही मालिका टीव्हीवर पाहिली नाही. मला तो लोकांनी माझीच मालिका पाहण्याचा दिलेला सल्ला पटायचा नाही. माझ्या मुलीने एकदा मला तुम्हाला ही मालिका माझ्यासोबत बघावीच लागेल असा हट्ट धरला. त्यावेळी मी एकदाच ती टीव्हीवर पाहिली होती. त्यानंतर तीने मला मुख्य कलाकारांना भेटायचं असं सांगितलं. मी ती भेट घडवून आणल्यानंतर काही दिवस मी घरात एखाद्या हिरो सारखा वावरत होतो,” अशी आठव रॉन यांनी सांगितली होती.