https://images.loksatta.com/2019/12/Marriage.jpg?w=830
मेव्हणीबरोबर केले लग्न

…म्हणून त्याने पहिल्या पत्नीच्या उपस्थितीत मेव्हणीबरोबर केले लग्न

मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला

by

मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यामधील एका गावातील सरपंचाने पत्नीच्या उपस्थितीत आपल्या मेव्हणीबरोबर लग्न केले आहे. सध्या या लग्नाची पंचक्रोशीमध्ये चर्चा आहे. लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिपू परिहार असे आहे. आपल्या पत्नीच्या परवाणगीनंतर दिपूने आपल्या पत्नीच्या चुलत बहिणीशी लग्न केले. इतकचं नाही तर या दुसऱ्या लग्नामध्ये त्याने आपल्या पहिल्या पत्नीशी पुर्नविवाह केला. हे लग्न २६ नोव्हेंबर रोजी पार पडले असले तरी त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हे लग्न मेहगाव जनपद येथील गुदावली गावात पार पडले.

हिंदू धर्मामध्ये पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करण्याची पद्धत नाही मात्र दिपूने खरोखरच आपल्या पत्नीच्या साक्षीने दुसरे लग्न केले आहे. हे लग्न करण्याआधी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला वरमाला घातली. त्यानंतर त्याने पहिली पत्नी मंचावर असतानाच सप्तपदी घेऊन दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीकडून दिपूला तीन मुले आहेत. सर्वात मोठ्या मुलाचे वय ९ वर्षे आहे. तर दोन लहान मुलींचे वय सात आणि पाच वर्षे आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार हा विवाह बेकायदेशीर आहे. असं असलं तरी दिपूविरोधात अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. या विवाहाची पंचक्रोशीमध्ये चर्चा असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच या विवाहबद्दल आजूबाजूच्या गावातील लोकांना समजले.

लग्नास कारण की…

गुदावली गावात राहणाऱ्या दिपूच्या म्हणण्यानुसार त्याची पहिली पत्नी सतत आजारी असते. त्यामुळे तिला मुलांचे संगोपन करता येत नाही. त्यामुळेच त्याला दुसरे लग्न करावे लागले. या लग्नाला दिपूचे नातेवाईक तसेच दिपूच्या दोन्हीकडील सासरवाडीचे लोकही उपस्थित होते हे विशेष. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.