IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा महत्वाचा निर्णय, RCB च्या फलंदाजावर बोली लावण्याची शक्यता
Trails साठी फलंदाजाला दिलं आमंत्रण
by लोकसत्ता ऑनलाइनआयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात हा लिलाव पार पडणार आहे. आगामी हंगामासाठीची Player Transfer Window बंद झालेली असून, एकूण ९७१ खेळाडूंनी या लिलावात सहभाग घेतला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही आगमी लिलावाच्या आधी युवराज सिंह, बेन कटींग, एविन लुईस, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन सह आणखी काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे आगामी हंगामासाठीच्या लिलावाकरता केवळ १३.०५ कोटी रुपयेच शिल्लक राहिलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सने RCB चा फलंदाज मिलींद कुमारला Trials (सरावाकरता) बोलावलं आहे. सध्या त्रिपुरा संघाकडून खेळणाऱ्या मिलींदने आयपीएलमध्ये बंगळुरु आणि दिल्ली संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र आतापर्यंत एकाही सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही. मात्र रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या आश्वासक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने मिलींद कुमारवर बोली लावण्याचा विचार केलेला आहे.
युवराज सिंहला करारमुक्त केल्यामुळे मुंबई इंडियन्स मधल्या फळीत एका आश्वासक फलंदाजाच्या शोधात असणार आहे. सध्या मुंबईच्या संघात इशान किशन हा यष्टीरक्षक-फलंदाज असला तरीही त्याच्या खेळात सातत्य नाहीये. त्यामुळे आगामी हंगामात सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास मुंबईचा संघ मिलींद कुमारला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेऊ शकतो.