Delhi Fire: “बाबा फॅक्टरीत आग लागली आहे, आम्हाला वाचवा…”, मुलाचा तो फोन ठरला शेवटचा
उत्तर दिल्लीच्या अनाज मंडी भागातील बेकायदा कारखाने असलेल्या एका चार मजली इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ कामगारांचा मृत्यू झाला
by लोकसत्ता ऑनलाइन“बाबा खूप भीती वाटत आहे. कारखान्यात आग लागली आहे. बाहेर पडणं कठीण वाटत आहे. आम्हाला वाचवा”. आगीत अडकलेल्या मुलाने केलेला तो फोन वडिलांसाठी शेवटचा ठरला. हा त्या दोघांमधील शेवटचा संवाद होता. वडिलांनी “चिंता करु नकोस, देवावर विश्वास ठेव” असं सांगितलं. मात्र काही वेळाने फोन कट झाला…वडील हॅलो हॅलो बोलत होते पण समोरुन कोणीही उत्तर देत नव्हतं. उत्तर दिल्लीच्या अनाज मंडी भागातील बेकायदा कारखाने असलेल्या एका चार मजली इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ कामगारांचा मृत्यू झाला.
या कारखान्यात काम करणाऱ्या मोहम्मद इम्रान याने मुरादाबाद येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांना केलेल्या फोन शेवटचा फोन ठरला. इमारतीला लागलेल्या आगीत त्याचाही मृत्यू झाला. आगीतील धुरात गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. इम्रानचा छोटा भाऊ आणि चुलत भाऊदेखील आगीत मृत्यूमुखी पावले.
इम्रानचे नातेवाईक मोहम्मद जुबेर यांनी सांगितलं की, हे सर्वजण दिल्लीमधील भजनपुरा येथे राहतात. त्यांना रविवारी सकाळी इम्रानचे वडील मोहम्मद जलील अहमद यांचा फोन आला होता. त्यांनी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास इम्रानचा फोन आला होता असं सांगितलं.
इतक्या सकाळी मुलाचा फोन आल्याने जलील अहमद घाबरले होते. त्यांनी फोन उचलला तर मुलाने कारखान्यात आग लागली असल्याचं सांगितलं. आग वाढत चालली असून, वाचणं कठीण वाटत आहे. काहीही करुन आम्हाला वाचवा असं इम्रान पलीकडून सांगत होता. इथे जलील मुलाला देवावर विश्वास ठेवा, पोलिसांना फोन करा असं सागंत होते तितक्यात फोन कट झाला. यानंतर जलील अमहद यांना अनेक फोन केले, पण इम्रानने उत्तर दिलं नाही. त्यांनी दिवस उजाडेपर्यंत वाट पाहू असं ठरवलं.
आग इतकी मोठी असेल याचा त्यांना अंदाज नव्हता. जुबेर यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी सकाळी पुन्हा आम्हाला फोन करुन कारखान्यात काय परिस्थिती आहे जाऊन पाहण्यास सांगितलं. तिथे गेल्यानंतर ती परिस्थिती पाहून आम्हाला धक्काच बसला. “इम्रान जवळपास गेल्या पाच वर्षांपासून तिथे काम करत होता. त्याने आपला भाऊ इकराम यालाही तिथे बोलावून घेतलं होतं. इकरामसोबत दोन चुलत भाऊदेखील येथे कामाला आले होते. आगीत इम्रान, इकराम आणि दोन चुलत भावांपैकी एकाचा मृत्यू झाला,” अशी माहिती जुबेर यांनी दिली आहे.
इम्रानला तीन तर इकरामला दोन मुलं आहेत. मुरादाबाद येथे त्यांचं सगळं कुटुंब राहतं. कामातून वेळ मिळाला की सुट्टी घेऊन ते घरी जात असत आणि पैसे देत असत असं जुबेर यांनी सांगितलं आहे.