https://images.loksatta.com/2019/12/Jayant-Patil-2.jpg?w=830

“भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांचे आम्हाला फोन”, जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

भाजपात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे

by

भाजपात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करु असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सांगलीमधील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं असल्याचंही यावेळी ते म्हणाले. जयंत पाटील यांनी सत्तास्थापन करण्यापुर्वी झालेल्या राजकीय घडमोडींवर बोलताना, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं असल्याचं सांगितलं.

पण भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र यावं हेच जनतेच्या मनात होतं. त्यामुळेच तशा राजकीय घडामोडी घडल्या असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं, आणि तसंच झालं. मात्र २०२४ मध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा प्रयत्न करु असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकरी कर्जमाफीवर बोलताना जयंत पाटील यांनी त्यासाठी राज्याच्या तिजोरीची स्थिती तपावासी लागणार आहे, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असं सांगितलं. पण लवकरच आम्ही त्यासंबंधी निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.