https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/rexsi_201912335959.jpeg
रणजी करंडक : मणिपूरच्या 19 वर्षीय गोलंदाजाची कमाल; मिझोरामचा संपूर्ण संघ 65 धावांत तंबूत

रणजी करंडक : मणिपूरच्या 19 वर्षीय गोलंदाजाची कमाल; मिझोरामचा संपूर्ण संघ 65 धावांत तंबूत

रणजी करंडक स्पर्धेचा 2019-20च्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली

by

रणजी करंडक स्पर्धेचा 2019-20च्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मणिपूरच्या 19 वर्षीय रेक्स सिंगनं कमालीची गोलंदाजी केली. कूच बिहार स्पर्धेत एका डावात 10 विकेट घेऊन चर्चेत आलेल्या रेक्सनं रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी मिझोरामला शरणागती पत्करण्यास  भाग पाडले. रेक्सच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संपूर्ण संघ 16 षटकांत 65 धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात उपहारापर्यंत मणिपूर संघानं 4 बाद 119 धावा करून 54 धावांची आघाडी घेतली आहे.

कूच बिहार ट्रॉफीच्या मागील मोसमात रेक्सने प्रतिस्पर्धी अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने 9.5 षटकांत 11 धावा देताना दहा विकेट्स घेतल्या होत्या. या दहा विकेट्समध्ये त्याने पाच फलंदाजांना त्रिफळाचीत केले होते, तर तीन फलंदाज पायचीत झाले होते. दोन फलंदाज झेलबाद झाले होते. ही अविश्वसनीय कामगिरी करताना त्याला तीन हॅटट्रिक्स नोंदवण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आले. 18 वर्षीय रेक्सला या कामगिरीचे बक्षीस मिळाले. भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली त्याला 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 

रणजी स्पर्धेतही रेक्सनं सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यानं आजच्या सामन्यात मिझोरामच्या 8 फलंदाजांना बाद केले. रेक्सनं 8 षटकांत 22 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. यात त्यानं 4 षटकं निर्धाव टाकली. त्याला बिश्वोजीत कोंथोऊजामनं दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. मिझोरामच्या तरूवर कोहलीनं सर्वाधिक 35 धावा केल्या. मिझोरामचे सहा फलंदाज शून्यावर तंबूत परतले.