https://images.loksatta.com/2019/12/Hyderabad-Encounter.jpg?w=830

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर आज तेलंगणा हायकोर्टात सुनावणी

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळून मारल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरचे सर्वसामान्यांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले होते. तर दुसरीकडे बुद्धिजीवी वर्गाने न्यायाचा हा मार्ग असंविधानिक

by

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी आज तेलंगणा हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी हायकोर्ट काय आदेश देईल याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळून मारल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरचे सर्वसामान्यांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले होते. तर दुसरीकडे बुद्धिजीवी वर्गाने न्यायाचा हा मार्ग असंविधानिक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मानवाधिकार आयोग, सरकार तसेच कोर्टानेही घेतली आहे.

डॉक्टर तरुणीची बलात्कार आणि जाळून हत्या केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता या प्रकरणातील सर्व चार आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. तपासादरम्यान, गुन्ह्याचा आढावा घेण्यासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी पाोलिसांकडील पिस्तूल हिसकाऊन घेऊन गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ हे एन्काऊंटर केले तसेच यासाठी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही हैदराबाद पोलिसांचे म्हणणे होते.

दरम्यान, हे प्रकरण हायकोर्टात दाखल झाल्यानंतर ज्या चार आरोपींना ठार करण्यात आले त्यांचे मृतदेह ९ डिसेंबर, रात्री ८ वाजेपर्यंत जतन करुन ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

तसेच या एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी तेलंगणा सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या एसआयटीची जबाबदारी रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रविवारी हैदराबादच्या साइबराबाद पोलिसांविरोधात बनावट एन्काऊंटर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.