विष्णूपुरीचे बारा दरवाजे बदलण्यात येणार
सिद्धेश्वर धरणातील पाण्याचा येवा सुरूच
by लोकमत न्यूज नेटवर्कठळक मुद्दे
- युद्धपातळीवर काम करून एका दरवाज्याची गळती थांबविली
नांदेड : नांदेड शहरासह अठरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या आणि सिंचनाची व्यवस्था असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पाचे बारा दरवाजे बदलण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात हे काम सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. बुधवारी प्रकल्पाच्या ११ क्रमांकाच्या दरवाजातून गळती सुरू झाली होती. ही गळती रात्री ११ वाजता थांबवण्यात आली.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या १८ पैकी क्रमांक ११ च्या दरवाज्यातून बुधवारी रात्री गळती सुरू झाली होती. ही बाब समजताच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता एम.डी. सूर्यवंशी, उपअभियंता शिवणगावक तसेच इतर कनिष्ठ अभियंते प्रकल्पस्थळी पोहचले तर पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार हे औरंगाबादला होते. या बाबीची माहिती समजताच ते तातडीने बुधवारी रात्रीच प्रकल्पस्थळी पोहचले. पहाटे ३ वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी प्रकल्पस्थळी होते. गळतीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे तसेच दरवाजा निखळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार उद्भवणार याची खबरदारी घेण्यात आली.
बुधवारी गळती सुरू झाल्यानंतर तातडीने प्रकल्पाचे स्टॉप लॉक गेट टाकण्याचे काम सुरु करण्यात आले रात्री ११ वाजता हे काम पूर्ण झाले आणि गळती पूर्णत: थांबविण्यात आली. या सर्व दरवाज्यांची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून दरवाजे बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सहा दरवाजे बदलण्यात आले आहेत. उर्वरीत दरवाजे लांबलेल्या पावसामुळे बदलता आले नाही. त्यामुळे प्रकल्पाचे उर्वरीत १२ दरवाजे बदलण्याचे काम येत्या १५ दिवसात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यातील सहा दरवाज्यांचे साहित्य प्रकल्पस्थळी उपलब्ध झाले आहे. इतर दरवाज्यांचे साहित्यही लवकरच मागवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.
गोदावरी नदीवर १९८९ मध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पावर नांदेड शहराची तहान भागतेच. त्याचवेळी इतर १८ गावांचा पाणीपुरवठा योजनाही या प्रकल्पावर आधारीत आहेत. विष्णूपुरी प्रकल्पाची एकूण पाणी क्षमता ८३.५५ दलघमी इतकी आहे तर जलाशयाची पूर्णसंचय पातळी ३५५ मीटर इतकी आहे. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ५१ हजार ३९० चौरस किलोमीटर इतके आहे. सदर प्रकल्पासाठी १६९ कोटी ११ लाख रुपये सन १९८९-९० च्या दरसुचीनुसार खर्च करण्यात आले होते.
या प्रकल्पांतर्गत ३७ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र वहिती लायक आहे तर सिंचनाखाली २८ हजार ३४० हेक्टर क्षेत्र येते. दरम्यान, या प्रकल्पातील गाळ उपसा करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. पाऊस लांबल्याने जिल्हा प्रशासनाने गाळ काढण्यास प्रारंभ केला. मात्र किती गाळ काढला हे मात्र पुढे आले नाही. त्याचवेळी दरवाजा बदलण्याचा विषयही अनेकदा चर्चेला आला होता.
विष्णूपुरीचा दरवाजा उघडला
सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदीचे पाणी विष्णूपुरीत दाखल होत असून प्रकल्प शंभरटक्के भरलेला आहे. त्यामुळे पाण्याची आवक पाहता प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता उघडण्यात आला होता. यातून अतिरिक्त पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरलेला असून पाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वेळीच प्रकल्पातून होणारी गळती थांबविण्यात आली असून इतर दरवाजेही बदलण्यात येणार आहेत.