‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपानेच वाढवली संजय राऊतांची सुरक्षा
आता राऊतांभोवती असणार ११ जावानांचं कडं
by लोकसत्ता ऑनलाइनलोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरुन चांगलाच वाद रंगला आहे. गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये सरकारीच बाजू मांडली. असं असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर राऊत यांनी राज्यसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदी सरकारने कलम ३७० चा निर्णय हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यसभेमध्ये या निर्णयाचे स्वागत करताना राऊतांनी पाकिस्तानवर टीका केली होती. “कलम ३७० हटवणे म्हणजे भस्मासूराचा वध करण्यासारखं आहे. आज जम्मू काश्मीर घेतलं आहे उद्या बलुचिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर घेऊ. पंतप्रधान अखंड हिंदुस्तानाचं स्वप्न पूर्ण करतील असा मला विश्वास आहे,” असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या वक्तव्याचे पोस्टर्स इस्लामाबादमध्ये झळकले होते. राऊत यांच्या या भाषणानंतर इस्लामाबादमध्ये राज्यसभेत भाषण करतानाचा त्यांचा फोटो आणि त्यावर ‘महाभारत – स्टेप फॉरवर्ड’ असे लिहिलेली ही पोस्टर्स होती. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर राऊत यांनी केलेल्या आक्रमक विधानाचाच वापर करण्यात आला होता. याघटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली होती, अशाप्रकारचे पोस्टर लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं, अखेर पोलिसानी ते पोस्टर हटवले होते. “पाकिस्तानात पोस्टर्स लागल्याबाबत आश्चर्य वाटले, शिवसेनेचे पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे, इस्लामाबादमध्येही शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे चाहते तेथे आहेत हे नक्की”, अशी प्रतिक्रिया यावर राऊत यांनी दिली होती. यानंतर पाकिस्तानमध्ये राऊतांचा विरोध करणारी पोस्टर्सही लागील होती.
याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता राऊतांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. व्हाय प्रकारच्या एक किंवा दोन कमांडो आणि पोलिस कर्माचाऱ्यांसहीत ११ जवानांचा समावेश असतो. यामध्ये दोन पीएसओचाही (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स) समावेश होतो.