उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार
राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे
by लोकसत्ता ऑनलाइनराज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यासोबतच विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी, “आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे, आज फक्त शुभेच्छा देऊयात, कोणतंही इतर भाष्य नको” सांगत बोलणं टाळलं.
शिवसेनेची स्थापना आणि प्रसार ज्या शिवाजी पार्कवरून झाला त्याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. या शपथविधीमध्ये मराठवाडा वगळता सर्व भागांतील मंत्र्यांना संधी मिळाली. महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी पावणेसात वाजता शपथ घेतली तेव्हा सारे शिवाजी पार्क ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्यासाठी आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला साष्टांग नमस्कार केला. उद्धव यांनी आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांना शपथ देत विधिमंडळ गटनेत्यास, तर सुभाष देसाई यांच्या रूपाने ठाकरे घराण्याच्या विश्वासू व्यक्तीस संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचे व मराठा समाजातील नेते जयंत पाटील यांच्यासोबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संधी देत सामाजिक समतोल साधला, तर काँग्रेसने दोन निष्ठावंतांची निवड करताना थोरात यांच्या रूपाने मराठा समाजाला, तर विदर्भातील नितीन राऊत यांच्या रूपाने दलित समाजातील नेत्याला संधी देत संदेश दिला.
शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सात मंत्र्यांच्या या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे केंद्रीय व इतर राज्यांतील नेते, तमिळनाडूच्या द्रमुक पक्षाचे एम. के. स्टॅलिन आदी नेत्यांनी हजेरी लावत देशात बिगरभाजप प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांची एकजूट शक्य असल्याचा राजकीय संदेश दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शपथविधीस हजर होते.
आणखी वाचा- राज यांच्या बहिणीने घडवून आणली रश्मी आणि उद्धव ठाकरेंची ओळख
शपथ घेताच पार पडली पहिली मंत्रीमंडळ बैठक
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गुरुवारी पहिली मंत्रीमंडळ बैठक घेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल, कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही असं आश्वासन दिलं.
शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांत मोठा निर्णय
महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. मी मुख्य सचिवांना जी मदत दिली आहे गेली त्याची माहिती देण्याचा आदेश दिला आहे. एक ते दोन दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करणार असून येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. घोषणांचा पाऊस झाला, मात्र पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.