https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/atm-39076_201910310297.jpeg
वसईच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खातेदारांची गाजियाबादच्या एटीएममधून लाखोंची लूट

वसईच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खातेदारांची गाजियाबादच्या एटीएममधून लाखोंची लूट

सतत दोन दिवस ही लूट सुरू असतानाही पालघर पोलिसांकडून काहीही कारवाई नाही

by

ठळक मुद्दे

आशिष राणे

वसई   -  वसई रोड पश्चिमेकडील अ‍ॅक्सिस बँकेच्या वसईतील २५ ग्राहकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम थेट गाजियाबादच्या एटीएम मशीनमधून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. मात्र, सदरचे पैसे दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ नोव्हेंबरला शुक्रवारी सकाळी सुद्धा अशाच प्रकारे गाजियाबादच्या एटीएममधून काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती पीडित खातेदार राहुल सेहगल यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

या सर्व प्रकारात वसईतील एक्सीस बँकेच्या २५ ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आल्यावर या सर्वांनी अ‍ॅक्सिस बँक व माणिकपूर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली असून या घडल्या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता आमच्याकडे फसवणूक झालेल्यांपैकी १० ते ११ खातेदार आले होते. त्यांच्याकडून आवश्यक माहिती व तक्रार अर्ज घेऊन आम्ही सदरचे प्रकरण सायबर सेलकडे पाठवले असून तेथून सखोल चौकशीअंती या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.
 
अधिक माहितीनुसार, वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे मेसेज गुरुवारी सकाळी अचानक आले असता ही रक्कम थेट गाजियाबाद येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे ग्राहकांना समजल्यावर फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली. त्यावेळी दिवसभरात साधारण २५ जणांची एकाच पद्धतीने अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये ३८ हजार, ४० हजार,१ लाख १० हजार, २१ हजार, १२ हजार असे सरासरी ४०  हजार रुपये म्हणजेच २५ जणांच्या खात्यातून साधारण कोट्यवधी रुपये हडप करण्यात आले असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी चार ते पाच जणांच्या रक्कमा लाखांच्या घरात आहेत. दरम्यान, या फसवणूक झालेल्या सर्वांनी प्रथम बँकेच्या व्यवस्थापकाला धारेवर धरत जाब विचारला असता त्यावेळी बँकेनं त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वैतागून या सर्व ग्राहकांनी गुरुवारी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरचे प्रकरण सायबर गुन्ह्याअंतर्गत येत असल्याने आधी गुन्हा न नोंदवता या सर्वांना हे प्रकरण आधी सायबर सेलकडे जाऊन त्यांची शहानिशा झाल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करता येईल असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले होते.

गाजियाबादमध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचा ग्राहकांना संशय ?
अ‍ॅक्सिस बँकेच्या एकाच शाखेतील २५ जणांच्या खात्यातून आणि गाजियाबाद येथील एकाच एटीएममधून तब्बल दोन दिवस लाखो रुपये काढण्यात आल्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला आहे. तर बँकेतील एखादी व्यक्ती गुन्हेगारांच्या संपर्कात असावी आणि त्यांनीच आमच्या बचत खात्यांची सविस्तर माहिती दिली असावी असा दाट संशय या खातेदारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच आमची गेलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणीही यावेळी बँकेला करण्यात आली. फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये राहुल सेहगल, तनाज पटेल, अमित पाडवी आदी अधिक जणांचा समावेश आहे.

पालघर पोलिसांनी तात्काळ गाजियाबादच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क करणे आवश्यक

एकाचवेळी २५ जणांच्या खात्यातून गाजियाबाद हुन सतत दोन दिवस एकाच वेळी सकाळी एटीएममधून पैसे काढले जातात याचाच अर्थ इथे बँकेशी संपर्कात असलेली टोळी कार्यरत आहे. त्यामुळे गुरुवारी तक्रार करून देखील बँक व्यवस्थापन असेल अथवा गुन्हा थांबवण्यसाठी माणिकपूर पोलीस ठाणे व त्यांचे पालघर पोलीस अधीक्षक यांचे सायबर सेल खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.त्यांनी तात्काळ गाजियाबाद पोलिसांना संपर्क केला असता तर शुक्रवारी सकाळी पुन्हा जी रक्कम त्याच एटीएममधून काढल्या गेल्या त्याला आळा बसून गुन्हेगार ही शोधण्यात मदत झाली असती. - राहुल सेहगल, खातेदार, अ‍ॅक्सिस बँक ,वसई (ओमनगर)

१० टक्के कमिशनवर खातेदारांची चोरायची माहिती 
दिल्ली,गुडगाव ,उत्तरप्रदेश,हरियाणा ओडिसा मध्ये अशा १० टक्के कमिशनवर टोळ्या सक्रिय आहेत. दोनच महिन्यापूर्वी उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडून एटीएम कार्ड क्लोनिंग व एटीएममधून पैसे काढणे आदी गुन्ह्यांची उकल करत एका टोळीचा पर्दाफाश करीत त्यांना अटक केली होती. ह्या टोळीची मोडस ऑपरेंडी ही खासकरून मुंबई व त्याच्या उपनगरतील बँक ग्राहकांची माहिती मिळवायची आणि आपल्या दिल्लीत बसलेल्या टोळी प्रमुखाला पाठवायची टोळीतील सदस्याला प्रत्येक रक्कम काढण्यावर १० टक्के कमिशन मिळते तर १ हजार रुपयाप्रमाणे प्रत्येक कार्डावर पैसे मिळवणे हेच कमिशन