https://images.loksatta.com/2019/11/sadhvi-pragya-singh-thakur.jpg?w=830
संग्रहीत

“साध्वी प्रज्ञा यांचा पुतळाच नाहीतर त्यांना देखील जिवंत जाळू”

जाणून घ्या कोणत्या काँग्रेसच्या आमदारांने केले आहे वादग्रस्त वक्तव्य

by

मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार गोवर्धन दांगी यांनी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, त्या कधी मध्यप्रदेशमध्ये आल्यातर त्यांचा पुतळाच नाहीतर त्यांना देखील जिवंत जाळू, असं आमदार गोवर्धन यांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे.

‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले होते. ‘विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली’ हे राजा यांनी सभागृहात सांगितले होते. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत ‘तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये’, असे बजावले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता. अखेर शुक्रवारी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत लोकसभेत माफी मागितली.

मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असं म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपाने कारवाई केली होती. वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.