“उद्धव ठाकरेंनी आता सामनाचं नाव बदलून ‘सोनिया नामा’ करावं”
"गोडसेभक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा"
by लोकसत्ता ऑनलाइनउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये काही भाजपाचे नेतेदेखील होते. भाजपाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा राव यांनीदेखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकादेखील केली आहे. जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी उद्धव ठाकरेंना गोडसेभक्त म्हटलं आहे. तसंच सामनाचं नाव बदलून ‘सोनिया नामा’ करा असा टोलाही लगावला आहे.
जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या गोडसेभक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी एका राजवटीसमोर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली आहे. सामनाचं नाव ‘सोनिया नामा’ करत आता पूर्ण आत्मसमर्पण करा. तुमच्या तिसऱ्या दर्जाच्या वृत्तपत्रात येणाऱ्या मूर्ख संपादकीय ते सहन करणार नाहीत”.
‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.
आणखी वाचा- “आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी १० जनपथवर नाक रगडावे लागेल”
शिवसेनेची स्थापना आणि प्रसार ज्या शिवाजी पार्कवरून झाला त्याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. या शपथविधीमध्ये मराठवाडा वगळता सर्व भागांतील मंत्र्यांना संधी मिळाली. महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.