‘…म्हणून ‘पानिपत’ मराठीत डब करणार नाही’ – आशुतोष गोवारीकर
पानिपतवरुन देशात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
by लोकसत्ता ऑनलाइन“मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
परंतु कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की देशात त्यावरुन उलट सुलट चर्चा सुरु होतात. त्यातील संदर्भ, गाणी, दृष्य यावरुन काही मंडळी आक्षेप घेऊ लागतात. असेच काहीसे प्रश्न ‘पानिपत’च्या बाबतीतही विचारले जात आहेत. त्यातीलच एक मोठा प्रश्न म्हणजे “पानिपत मराठी भाषेत का तयार केला गेला नाही?” या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.
काय म्हणाले आशुतोष गोवारीकर?
“मराठीत जास्तीत जास्त चार कोटी रुपये इतकं बजेट असलेले चित्रपट तयार केले जातात. यापेक्षा जास्त पैसे खर्च करायला कुठलाच निर्माता तयार नसतो. मला पानिपतसाठी जवळपास १०० कोटी रुपये हवे होते. त्यामुळे आर्थिक गणिताचा विचार करुन हा चित्रपट मराठीत तयार केला गेला नाही. शिवाय हिंदीत चित्रीत केलेला चित्रपट मराठीत डब करण्याचा पर्याय माझ्यासमोर आहेच. परंतु, मी ‘पानिपत’ मराठीत डब करणार नाही. कारण तसे केले तर हिंदी चित्रपट मराठीत डब करण्याचा एक नवा पायंडा पडेल. आणि त्याचा फटका मराठी चित्रपटांना बसायला सुरुवात होईल.”
‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटात पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा दाखवण्यात आली. यामध्ये अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ तर क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. यासोबतच संजय दत्त, मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.