Maharashtra CM: या सदऱ्याचा रंग कुठल्याही लाॅन्ड्रीत धुतला तरी जाणार नाही : उद्धव ठाकरे
Maharashtra CM: मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या पत्रकारांशी संवाद साधला.
by ऑनलाइन लोकमतमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शपथविधीसाठी भगव्या रंगाचा सदरा परिधान केला हाेता. आज त्यांनी दुपारी मंत्रालयात येत पदभार स्वीकारला. यावेळीसुद्धा त्यांनी भगव्या रंगाचा सदरा परिधान केला हाेता. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना सदऱ्याच्या रंगाबाबत प्रश्न केला असता भगवा हा जन्मभराचा आवडता रंग आहे असे ते म्हणाले. तसेच या रंगाच्या सदऱ्याला कुठल्याही लाॅन्ड्रीमध्ये धुण्यास दिले तरी त्याचा रंग जाणार नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
काल शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. त्याआधी त्यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. मंत्रालयातील पत्रकारांशी त्यांनी दुपारी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. जनतेचा पैसा याेग्य प्रकारे वापरला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. तसेच आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
उद्धव ठाकरे महत्त्वाच्या ठिकाणी नेहमीच भगव्या रंगाचा सदरा परिधान करत असतात. राज्यपाल भगतसिंह काेशारी यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी याच रंगाचा सदरा परिधान केला हाेता. तसेच काल झालेल्या शपथविधी साेहळ्यात देखील त्यांनी भगवा सदरा घालूनच शपथ घेतली. आज मंत्रालयात पदभार स्वीकारताना देखील त्यांनी त्याच रंगाचा सदरा घातला हाेता. या सदऱ्यावरुन त्यांना प्रश्न केला असता हा सदऱ्याचा रंग जन्मभराचा आवडता रंग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ज्या गाेष्टी आवश्यक आहेत, त्या करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.