https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/adthkne_201911331855.jpg
'होय, आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती', वृक्षतोडीला विरोध करणारे आदित्य ठाकरे म्हणतात... 

'होय, आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती', वृक्षतोडीला विरोध करणारे आदित्य ठाकरे म्हणतात... 

उद्धव ठाकरेंनी आज पदभार स्विकारल्यानंतर परंपरेनुसार विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला

by

मुंबई - आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिला. पण, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी, आरेतील कारशेडच्या स्थगितीचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यावर, आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी या निर्णयाचं स्वागत केलं असून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचं आदित्य यांनी म्हटलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या निर्णयामुळे मुंबईतील सर्वच नागरिक आनंदी झाले आहेत, असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तसेच, विकासकामे सुरु राहतीलच, पण पर्यावरणाला होणार हानी चालणार नाही, त्यामुळे आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं आदित्य यांनी म्हटलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरूवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवनाला रोषणाई करण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भवनासमोर नागरिकांनी पोस्टर झळकावून उद्धव ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली होती. तर, आदित्य ठाकरेंनीही आरे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. त्यावेळी, ते फडणवीस सरकारसोबत होते. 

उद्धव ठाकरेंनी आज पदभार स्विकारल्यानंतर परंपरेनुसार विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितलं.    

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती.  
दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.