https://images.loksatta.com/2019/11/Manhole.jpg?w=830

सफाई कर्मचारी पदासाठी सात हजार इंजिनिअर, पदवीधर तरुणांचे अर्ज

बेरोजगारी वाढल्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण छोट्या पदांवरही नोकरी करण्यास तयार असल्याचं चित्र आहे

by

बेरोजगारी वाढल्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण छोट्या पदांवरही नोकरी करण्यास तयार असल्याचं चित्र आहे. कोईम्बतूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी चक्क इंजिनिअर, पदवीधर तसंच डिप्लोमा केलेल्या तरुणांचे अर्ज आले आहेत. ग्रेड-१ साठी ही भरती होणार आहे. महापालिकेने ५४९ सफाई कर्चमाऱ्यांच्या जागांसाठी अर्ज मागवले होते. बुधवारी अधिकाऱ्यांनी उमेदवारांची मुलाखत घेतली तसंच कागदपत्रांची छाननी केली असून, यावेळी सात हजार जण उपस्थित होते अशी माहिती देण्यात आली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पदासाठी आलेल्या अर्जात ७० टक्के उमेदवार पात्रतेत बसणारे असून, अनेकजण इंजिनिअर, पदव्युत्तर, पदवीधर तसंच डिप्लोमा पूर्ण केलेले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अर्ज केलेल्यांपैकी अनेक उमेदवार आधीच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करत असल्याचं समोर आलं आहे. पण सरकारी नोकरी आणि १५,७०० रुपये पगार असल्याने अनेकांनी आपण इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. तसंच गेली १० वर्ष कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या काहीजणांनीही या जागेसाठी अर्ज केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पदवीधर तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळालेली नसून, कुटुंबाला आर्थिक पाठिंबा म्हणून सहा ते सात हजारांमध्ये खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करावी लागत आहे. या कंपन्यांमध्ये १२ तास नोकरी करुनही नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती त्यांना नाही.

दुसरीकडे, सफाई कर्मचाऱ्याच्या नोकरीत जवळपास २० हजार रुपये पगार आहे. कामाच्या वेळाही सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास अशा आहेत. मधल्या काळात इतर काम करण्याची मुभाही त्यांना आहे. सध्या महापालिकेत दोन हजार कायमस्वरुपी तर ५०० कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत.