https://images.loksatta.com/2019/11/milk.jpg?w=830

हद्द झाली : एक लिटर दुधात पाणी मिसळून दिलं ८१ विद्यार्थ्यांना

मध्यान्ह भोजनादरम्यान हा प्रकार घडला.

by

सध्या अनेक राज्य सरकारांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पण अनेकदा यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये मध्यान्ह भोजनातीची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशातील सोनभद्र येथील घटना समोर आली आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दुध देण्यात आलं. परंतु एक लिटर दुध ८१ विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसंच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी तपास करून कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत १५० मिलीलिटर दुध देण्यात येणार होतं. ग्राम पंचायतीच्या प्राथमिक शाळेत १७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बुधवारी यापैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ १ लिटर दुध पाठवण्यात आलं. प्रत्येक विद्यार्थ्यांना १ ग्लास दुध मिळावं यासाठी त्यामध्ये १ बादली पाणी मिसळण्यात आलं.

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर ग्राम पंचायतीचे वॉर्ड क्रमांक ७ चे सदस्य देव कालिया यांनी कायम अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला. आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी काहीही न बोलता असं पाणी मिश्रीत दुध पितात. अनेकदा अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं ते म्हणाले. याप्रकरणी शाळेचे प्रभारी शैलेश कनोजिया यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याकडे दोन्ही शाळांचा प्रभार असल्यामुळे वेळेत दुध उपलब्ध होऊ शकलं नसल्याचं म्हटलं. आम्ही त्यानंतर दुधाची व्यवस्था केली परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा दुध देण्यास मनाई केली. तसंच ते दुध दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्याच्या सुचना केल्या, असंही ते म्हणाले.