महाराष्ट्रानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप होणार, संजय राऊत यांचा दावा
लवकर गोव्यात चमत्कार दिसेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे
by लोकसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. गोव्यात सध्या भाजपाचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.
आमच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपलं असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. “महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फ्रंट उभा केला जात आहे. गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केलं आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात,” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्याच्या भुमिकेतून बाहेर पडणं गरजेचं असून, उत्तम विरोधक म्हणून काम करतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावला. याआधीच्या विरोधी नेत्यांनी केलेल्या कामाचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली चर्चा गोपनीय असते. पहिल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावंर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांसंबंधी चर्चा सुरु असून उद्धव ठाकरे दोन दिवसांत त्याचा पूर्ण अभ्यास करतील आणि निर्णय घोषित करतील,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
२०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त १७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपा फक्त १३ जागांवर विजय मिळवू शकला होता. पण भाजपाने संधी साधत इतर पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली होती. भाजपाला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला होता. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून राज्यात आणण्यात आलं होतं. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.