https://images.loksatta.com/2019/11/Fvb.jpg?w=830
संजय राऊत

…म्हणून संजय राऊत शपथविधी सोहळा संपण्याआधीच शिवाजी पार्कमधून निघून गेले

उद्धव यांनी गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

by

‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मात्र शिवसैनिकच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा यासाठी जीवाचं रान करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना या शपथविधी सोहळ्यातून अर्ध्यातूनच निघावे लागले.

शिवाजी पार्कवर पार पडलेला शपथविधीचा संपूर्ण सोहळा राऊत यांना पाहता आला नाही. हा सोहळा अर्ध्यात सोडून त्यांना बाहेर पडावं लागलं. सोहळ्यासाठी झालेली प्रचंड गर्दी आणि मंचावर येताना समर्थकांच्या गर्दीतून वाट काढत येताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे राऊतांना मंचावर प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळेच त्यांनी सोहळ्यातून काढता पाय घेतला. सोहळ्यामधून राऊत आराम करण्यासाठी थेट स्वातंत्रवीर सावरकर स्मारकामध्ये गेले. तेथे रणजीत सावकर यांच्या सोबत होते. तिथेच राऊतांनी काही काळ आराम केला तेव्हा त्यांना जरा बरं वाटू लागलं. मात्र तोपर्यंत शपथविधी सोहळा संपला होता.

निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेत बिसल्यावर राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार यावे म्हणून राऊत वेगवेगळ्या नेत्यांच्या संपर्कात होते. निकाल लागल्यापासून दररोज पत्रकार परिषद घेऊन ते पक्षाची भूमिका मांडताना दिसले. दरम्यानच्या काळात ११ नोव्हेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली. १३ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी सत्तास्थापनेसंदर्भात बैठका आणि पक्षाची भूमिका मांडण्याबरोबर हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीही गाठली.