Video : प्रत्येकाने पाहावा असा तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर

'फक्त कानाखालीच मारली ना' असं म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा या चित्रपटाचा विषय आहे.

by

एखादा कलाकार कोणता चित्रपट करतो यापेक्षा कोणत्या विषयाचे चित्रपट करतो या गोष्टीला फार महत्त्व असतं. हेच महत्त्व लक्षात घेत अभिनेत्री तापसी पन्नू एकापेक्षा एक दमदार असे विषय प्रेक्षकांच्या समोर मांडतेय. आगामी ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून तापसी पुन्हा एकदा महिलांचा विषय समोर आणणार आहे पण एका वेगळ्या पद्धतीने.. विषय तसा पाहिला तर साधाच आहे.. पतीने पत्नीवर उगारलेला हात. मात्र या विषयाची गंभीरता आपल्याला चित्रपटाचा ट्रेलर पाहून कळते.

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमधून साध्यासोप्या वाटणाऱ्या मुद्द्याची गंभीरता सहज लक्षात येते. पतीने पत्नीला फक्त कानाखाली मारल्याचीच चित्रपटाची गोष्ट आहे पण… हा ट्रेलर ‘फक्त कानाखालीच मारली ना’ असं म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘थप्पड’चे दिग्दर्शन केले आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्यामध्ये ‘थप्पड’चा विषय काय वळण घेऊन येतो हे याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यातील संवादसुद्धा मनाला भिडतात.